Sunday, July 2, 2017

आज तो खूप excited होता. ज्या गोष्टीची इतक्या आतुरतेने तो..तोच काय घरातले सगळेच वाट पाहत होते...कदाचित ती गोड बातमी आज त्यांना मिळणार होती. ती आल्यावर लगेच दोघं निघणार होती डॉक्टर कडे जायला. हो! बहुतेक त्यांना इतके महिने, इतके दिवस हूल देणारा छोटा पाहुणा अखेर त्यांच्या घरात येणार होता. पाहुणा किंवा पाहुणी. काही चालेल. जे होईल ते आपले असेल. पण आपले आयुष्य मात्र बदलून जाईल त्याच्या येण्याने.
आज आईला ही गोड बातमी कळल्यावर तिच्या चेहऱ्यावर दिसणाऱ्या अकस्मात आनंदाची कल्पना करून तो मनातून हुरळून गेला होता. खूप पाऊस येऊन गेल्यानंतरआकाशात अचानक दिसणाऱ्या ईंद्रधनुष्यासारखे सगळे रंगीत होऊन जाईल. त्याला स्वतःवर हसू आले. ह्या सुंदर गोष्टीने त्याला काव्यात्मक विचार करायला भाग पाडलंय. कविता हा त्याचा प्रांत कधीच नव्हता.

तो तिच्या साठी तयार होऊन बसलाच होता.  थोड्या वेळाने ती आली. पार थकलेली, ओढलेली दिसत होती. त्याला वाटलं दिवसभराच्या कामाने थकली असेल. आता चहा घेऊन फ्रेश झाली की होईल नीट. पण ती काही बोलेचना. त्याच्या नजरेला तिची नजर भिडली आणि तिला रडूच फुटलं.

"काय झालं ग?" त्याने गोंधळून जाऊन विचारलं. त्यासरशी ती त्याला त्याला बिलगून हमसाहमशी रडू लागली.
थोड्या वेळाने रडण्याचा भर ओसरल्यावर तिने त्याच्या कडे पाहून नकारार्थी मान हालवली. त्याला याय कळायचं ते कळलं आणि झटकन त्याच्या चेहऱ्याचा रंग उडाला.
" अगं पण इतक्या उशिरा?"
ती काहीच बोलली नाही. तिचे डोळे अजूनही वाहतच होते.
"तूच म्हणाली होतीस ना १५-१६ दिवस उलटून गेलेत म्हणून?" ती गप्पच. ह्यावर काय उत्तर देणार? खरंच १६ दिवस उलटून गेले होते आणि तिची पाळी अगदी नियमित होती. मग असं कसं झालं? 

ती विचार करतच सोफ्यावर बसून राहिली. त्याचा मात्र पार मूड गेला होता. तो लांब खिडकीत जाऊन उभा राहिला. त्याच्या कडे नजर जाताच तिला खूप वाईट वाटलं. लग्न नंतर वर्षभर त्यांनी planning केलं  होतं . पण जेव्हा पासून बाळ होऊ द्यायचा निर्णय त्यांनी घेतला होता तेव्हा पासून  त्याच्या नजरेत दररोज, सतत तिने एक आशा बघितली होती. बाबा होण्याची. आपल्या घरात कोणीतरी लहान मूल  येणार ह्या विचारानेच त्याच  भान हरपून जायचं. लहान मुलं म्हणजे त्याचा जीव की प्राण. त्यात आपलं स्वतःचं बाळ म्हणजे प्राणाहून ही प्रिय.  तिला क्षणभर अपराधी ही वाटून गेलं

तिचंही हे स्वप्न होतंच. तिलाही आशा होती नव्या पाहुण्याची. तिला आई म्हणणाऱ्या नव्या जीवाची तिलाही ओढ लागली होती. म्हणून तर ४ महिनेच प्रयत्न करून यश येत नाही म्हटल्यावर तिही लगेच ट्रीटमेंट घ्यायला तयार झाली होती. दोघांचेही सगळे मेडिकल रिपोर्ट्स नॉर्मल होते. आणखी 2 महिने  असेच गेल्यावर सासू बाईंनी तर लगेच देव-ब्राम्हण, गुरुजींना साखडं घालायला सुरुवात केली होती. त्यांच्या नजरेत मात्र दर महिन्याला ही 'झाली' कळलं की फक्त तिरस्कार दिसायचा. मग पुढचे ४ दिवस फक्त टोमणे आणि तिरसट बोलणं. तसं एरव्ही पण काही त्या फार प्रेमाने बोलायच्या, वागायच्या असं नाही. तिची नव्याची नवलाई संपल्यावर त्यांच्यातली सासू हळूहळू डोकावू लागली होती. आणि बाळाचा विषय म्हणजे अगदी त्यांच्या कुटुंबाचा...घराण्याचा कुलदीपक अँड ऑल.

तरी त्यांचा हेतू वाईट नाही म्हणून तिनं ह्याबाबतीत त्यांचं सगळं ऐकून घेतलं होतं आता पर्यंत. एका गुरुजींनी पूजा घालायला सांगितली होती. सासूबाईंनी तिच्या आईला फोन करून तिच्या माहेरी पूजा घालायला सांगितली. का तर म्हणे तिच्या पत्रिकेत मातृसुखासाठी काही अडचणी आहेत. तिच्या आईने तिच्या माहेरच्या गुरुजींना विचारले तर ते  म्हणाले की ही पुणे जोड्याने करायची असते आणि त्यांच्या घराच्या वंशा साठी इथे पुजा  करून काही फळ मिळणार नाही. पण सासू बाई त्यांच्या निर्णयावर ठाम होत्या. म्हणे पूजा तिच्या माहेरीच करायची! काही दिवस असेच गेले. मग तिला कळलं की  त्या पुजे साठी कुठल्याशा देवाच्या सोन्याच्या मूर्ती घडवायच्या होत्या. सगळं मिळून पूजेचा खर्च पंचवीस हजार होत होता. म्हणून त्या तिच्या माहेरच्यांवर सगळं टाकायला बघत होत्या. म्हणजे वंश तुमचा वाढणार आणि भुरदंड माझ्याच  आई वडिलांना. शिवाय कशावरून माझ्याच पत्रिकेत दोष आहे? आणि असला तरी मी आता ह्या घराची झालीये ना? मग पूजा माहेरी का? आणि  हे सगळे  करुन बाळ  होणारच अस का कुणाला संगता येतं ? तिला अतिशय वाईट वाटलं होतं. पण सासू बाईंना ह्या विषयी ती  काहीच बोलली नव्हती.

काहीच होत नाही म्हटल्यावर सासूबाईंनी दुसऱ्या गुरुजींना गाठलं. त्यांनी प्रत्येक दिवस तिला एकेक देव वाटून दिला. सोमवारी शंकराला बेल आणि नारळ वाहायचा, मंगळवारी गणपतीला दुर्वा, जास्वंद आणि नारळ वाहायचा, गुरुवारी औदुंबराला ७ प्रदक्षीणा घालायच्या, शुक्रवारी भवानी मातेची ओटी भरायची आणि शनिवारी मारुतीला तेल वाहायचं. एवढ सगळं वेगवेगळ्या देवळात जाऊन करायचं म्हणजे सकाळी आवरणार कधी आणि ऑफिसला जाणार कधी? ह्यावर सासू बाईंनी त्यांच्या जालीम डोक्यातून एक जालीम उपाय सुचवला. म्हणे चार महिने ऑफिसला हाफ डे घेऊन मग जा. तिने ऑफिस मध्ये चालणार नाही म्हटल्यावर म्हणे, त्यांना सांग अर्धाच पगार द्यायला ४ महिने. आपल्याला काय पैसा महत्वाचा आहे की बाळ होणं? तिने मनातल्या मनात कपाळावर हात मारून घेतला. ती काय कुठे रोजंदारी वर मजुरी करायला जात होती का, ४ महिने अर्धा दिवस कामावर जायला? शेवटी नवऱ्याला तिने स्पष्टपणे सांगितलं मला हे पटत नाही. मी हे करणार नाही. नवरा म्हणे पटत मला पण नाही. पण ह्यात नुकसान काय आहे करून बघायला? तिने त्याच्या कडे जळजळीत कटाक्ष टाकल्यावर तो गप्प बसला. तरी बरं लग्नाला जेमतेम दिड वर्ष झालं होतं. ज्या लोकांना लग्नाच्या अनेक वर्षां पर्यंत बाळ होती नाही ते असेच वेड्या सारखे उपाय करतात का?

सगळं आठवून ती खूप उदास  झाली होती. डॉक्टरने त्या दोघांना ही सांगितलं होतं की प्रयत्न करत रहा. पण ह्या गोष्टीत यश येण्यासाठी तुझी मानसिक स्थिती आनंदी आणि समाधानी असणं हे  फार महत्वाचं आहे. घरातल्या  ह्या अशा वातावरणात कसला आनंद आणि कसलं समाधान? उलट ती दिवसें दिवस खचत चालली होती. सतत उदास राहायची. एकटीच रडत बसायची बरेचदा. पण तिला कधी कोणी समजून घेतलं नाही. खरंतर ह्यात तिचा दोष काहीच नव्हता. पण सगळ्यांच्या नजरेत तिला फक्त तिच्यावर आरोप दिसायचे, नवऱ्याच्याही. त्याने ही तिला कधी ह्या बाबतीत दिलासा देणारं काहीच म्हटलं नव्हतं. कळत नसेल का त्याला तिला किती त्रास होतोय ते? की त्याच्या स्वतःच्या स्वप्नामागे तो इतका उतावीळ झालाय की त्याला तिची परिस्थिती जाणून घ्यायची नाहीच आहे? पण हे स्वप्न पण तिच्या मुळे साकार होणार आहे ना? मग आधी तिला नको का बघायला?

ती उदासपणे उठली. बाथरूम मध्ये गेली. न्हाऊन बाहेर येते तोवरच सासूबाई आल्याच तिच्या खोलीत. ह्या वेळी न्हाईली म्हणजे...त्यांनी तिच्या कडे पहिले. तिने मान खाली घातली..का ते तिलाच कळले नाही..पण नंतर तिला स्वत:चाच राग आला.
"हो का? गेला का हा पण महिना? आमच्या नशिबात नातवाचं तोंड पहाणे नाहीच बहुतेक."

सासूबाई ३ वाक्यात गरळ ओकून गेल्या आणि तिच्या डोळ्यांना पुन्हा धारा लागल्या. ती किती वेळ रडत होती तिचं तिलाच कळलं नाही. पण मग थोड्या वेळाने तो खोलीत आला. तिचे रडून लाल झालेले डोळे आणि नाक पाहून त्याला वाईट वाटल असाव. तिच्या जवळ जाऊन त्याने तिच्या डोक्यावर थोपटलं आणि तो बाहेर जाऊ लागला.

" सॉरी." तिच्या आवाजाने तो थांबला.

" मी तुमचं स्वप्न पूर्ण करू शकत नाही आहे. ह्या घराला, तुम्हाला बाळ देण्यात मला यश मिळत नाही आहे. आपण divorce घेऊया. तुम्ही दुसरं लग्न करा. निदान तुमचं स्वप्न तरी पूर्ण होईल.


 त्याला आश्चर्य वाटलं आणि मग अपराधीही. आपण आपल्या स्वप्नाच्या नादात तिची मन:स्थिती समजूनच घेतली नाही. त्यांचं arrange  marriage असलं तरी गेल्या दिड वर्षात त्यांना एकमेकांची खूप सवय झाली होती. आणि त्याचं तिच्यावर प्रेम होतं. दुसऱ्या कोणाचा तो विचार ही करू शकत नव्हता. आणि ते पण फक्त बाळासाठी? आणि असंही नव्हते की त्यांचं आयुष्य किंवा  त्यांच्या कडचे सगळे मार्ग संपले होते. अगदीच नाही काही झालं तर ते दत्तक ही घेऊ शकत होते.

"वेडी आहेस का तू? मी काय फक्त बाळ होण्यासाठी तुझ्याशी लग्न केलंय? तू मला हवी आहेस ग. आयुष्याचा अखेरपर्यंत...जरी आपलं कुटुंब म्हणजे फक्त आपण दोघे असं समीकरण शेवट पर्यंत राहिलं तरी मला चालेल. पण मी तुला कधीच सोडणार नाही. माझं प्रेम आहे तुझ्यावर. परत असं बोलू नकोस. इतक्या लवकर हारून कसं चालेल? we have a long way to go dear "

तिला अगदी भरून आलं. ती लगेच त्याच्या मिठीत शिरली. दोघं बरच वेळ तशीच बसून होती....

-सुमेधा आदवडे

2 comments: